मी बोलू लागतो,
त्या पावसाबरोबर.
माझ्या एकटेपणात,
तोच माझा मित्र असतो.
थेंबाना विचारतो मी,
तिच्याबद्दल.
थेंब मग तिच्या आठवणी होतात
आणि हातावर त्यांना झेलतो मी.
त्या टप टप पावसात मग,
तिच हसू ऐकू येतं.
दाटलेल आभाळ,
तिचे केस होतात.
वारा मग,
त्या बटा उधळून लावतो
आणि त्या सागरात
मन तरंगत राहतं.
जुन्या आठवणी अचानक,
मन आठवू पाहतं.
हरवलेल्या भेटी,
पुन्हा शोधू लागतं.
त्या आठवणी ,
मी पुन्हा जगू लागतो.
पावसाच्या सोबतीनं,
मी तिला भेटून येतो.
माझ्या हास्यात पाऊस,
हसू होऊन बरसतो.
ओघळणारे अश्रू ,
आपलेच समजून पिऊन टाकतो.
पाऊस थांबला ,
की मग वाईट वाटतं.
मित्र दूर गेल्याचं ,
दुःख होतं.
पण मग परत,
ढग जमा होतात.
परत आभाळ फाटतं,
परत पाऊस येतो.
पुन्हा आम्ही बोलू लागतो.
कारण,
माझ्या एकटेपणात,
तोच माझा मित्र असतो.
-प्रांजल वाघ
१ ज्ञुलै २००९
This work by Pranjal A. Wagh is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-No Derivative Works 2.5 India License